
झाडाचे नाव:
अर्जुन
वृक्ष संबंधित नक्षत्र:
स्वाती
वैज्ञानिक पद्धतीने दिलेले नाव:
TERMINALLA ARJUNA
माहिती:
अर्जुनाचे झाड वयात आले की एखाद्या दधीची ऋषींसारखी, त्याची साल आपोआप गळून पडते. मानवाच्या आरोग्यासाठी ती देवासारखी उपयोगी पडते म्हणून त्या झाडाला देवसाल, शक्रतरू, इन्द्रू अशी इंद्राची नावे आहेत
नदीकाठी अर्जुनाची चांगली वाढ होते म्हणून याला नदीसर्ज असे नाव आहे.
अर्जुन वृक्षाला त्याच्या पांढऱ्या खोडामुळे हे नाव मिळाले आहे. पांढऱ्या किंचित हिरवट-राखाडी झाक असलेल्या गुळगुळीत खोडाचा हा वृक्ष अस्सल भारतीय वंशाचा आहे. वरचे खोडाचे साल निघून गेल्यावर याचे खोड ताजेतवाने दिसते. वर्षाचे किमान सहा-सात महिने वाहणारे पाणी असणाऱ्या ठिकाणी हा वृक्ष वाढतो. हे वाहणारे पाणी त्याचे बी रुजवतात.
समोरासमोर देठ असलेली व थोडा लांबट आकार असलेली किंचित फिकट हिरवी पाने, या पानांच्या मागे देठाजवळ, मधल्या शिरेच्या दोन्ही बाजूस गोगलगाईच्या शिंगाप्रमाणे दिसणाऱ्या दोन लहान ग्रंथी हे याचे वैशिष्टय आहे. ऐन आणि अर्जुन एकाचवेळी पावसाळ्यात फुलणारे व ताक घुसळण्याच्या रवीच्या बोंडाप्रमाणे पाच पंख असलेली फळे धारण करणारे असतात. फरक केवळ खोडात दिसतो. ऐनाचे खोड खरखरीत भेगा पडलेले व तपकिरी रंगाचे तर अर्जुनाचे गुळगुळीत व पांढरे असते. त्यामुळेच कोकणात हा पांढरा ऐन म्हणून ओळखला जातो. सालीतील कॅल्शियम मॅग्नेशियम व इतर उपयुक्त घटकांच्या संपन्नतेमुळे हा बलकारक आहे. म्हणून याला धन्वंतरी हे नाव मिळाले आहे. बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक ज्योतिर्लिंग प्रचंड मोठया अर्जुन वृक्षाखाली आहे. म्हणून ते नागार्जुन, तामिळनाडू येथील देवराईत एक भव्य अर्जुन वृक्ष असून त्याच्या खोडाचा घेर ३० फुट आहे. हा वृक्ष सुरूवातीच्या काळात फार हळू वाढतो. सुरूवातीला त्याला पाण्याचे दुर्भिक्ष चालत नाही. याचे देखणे पांढरे खोड असल्यामुळे हा वृक्ष रस्त्यांवर लावण्यालायक आहे
अर्जुनाची साल पांढरट, किंचित लालसर वर्णाची असते. अर्जुनाच्या सालीचा चटकन तुकडा पडतो. त्यात तंतुमय रेषा नसतात. त्यामुळे त्याचे चूर्ण एकदम गुळगुळीत शंखजिरे चूर्णासारखे असते. अर्जुन वृक्ष ६० ते ८० फूट उंच असणारे तपस्वी ऋषींसारखे उभे असतात.
