
झाडाचे नाव:
कदंब
वृक्ष संबंधित नक्षत्र:
सप्ततारका
वैज्ञानिक पद्धतीने दिलेले नाव:
NEOLAMARCKIA CADAMBA
माहिती:
कदंब ही झाडे साधारण १० ते २५ मीटर उंचीपर्यंत हा वाढतो. पानगळ मार्चमधे थोड्या काळासाठी होते, व पावसाळ्यात जुलै ऑगस्टमधे कदंबाला फुले येऊ लागतात. निसर्गप्रेमींना भुरळ पाडणारा कदंब वृक्ष अत्यंत राजस दिसतो. निसर्गात पूर्ण वाढलेल्या वृक्षाची उंची ३० मीटर पर्यंत जाते. रोप लावल्यापासून पहिले सहा ते आठ वर्षापर्यंत वाढ भर-भर होते, मग स्थिरावते आणि २० वर्षांपर्यंत पूर्ण होते. वृक्ष दीर्घायुषी असून, शंभर वर्षं जगू शकतो. कदंबाच्या ताठ राखाडी रंगाच्या बुंध्यावर काटकोनात पसरलेल्या फांद्यांमुळे वृक्षाचा आकार छत्रीसारखा दिसतो. पानगळीचा वृक्ष असूनही संपूर्ण निष्पर्ण वृक्ष आढळत नाही, कारण याची पाने एकदम गळत नाहीत. ही पाने आंब्याच्या आकाराची पण जरा रुंद असतात. पुढून हिरवीगार व तुकतुकीत असतात अन् मागच्या बाजूने काहीशी फिकट लवयुक्त असतात. पानांवरच्या शिरा उठून दिसतात. पण वृक्षाची खरी मजा त्याच्या फुलांमध्ये आहे. कदंबाचे एक फूल म्हणजे फुलांचा गोळाच असतो. जणू एखाद्या चेंडूवर बारीक-बारीक फुले सर्व बाजूंनी टोचली तर तो कसा दिसेल, तसेच कदंबाचे फूल दिसते. अगदी सोनेरी-केशरी रंगाचे गुबगुबीत गेंदेदार पिंजलेल्या कदंबवृक्षाच्या खाली उभे राहिले की मधमाश्यांचे गुंजन अगदी स्पष्ट ऐकू येते. पावसाळ्यात इतर फुलांचे दुर्भिक्ष्य असल्याने मधमाश्या हमखास कदंबाच्या शोधात येतात.
कदंबाच्या फुलांसारखीच फळंदेखील लाडवासारखी गोल असतात. कदंबाचे फळ हे तांत्रिक भाषेत Pseudocorp म्हणजे छद्मफळ असते. फळे पावसाच्या शेवटच्या टप्प्यात पिकतात, त्यांना किंचित आंबट चवही असते. ग्रामीण भागातील मुले ही फळे आनंदाने खातात. मनुष्यांसारखेच अनेक पशु-पक्षीदेखील यांचा फडशा पाडतात, पण या फळांची सर्वात जास्त मजा लुटतात ती वटवाघळे. बदल्यात या फळांचा बीजप्रसार वटवाघळांमार्फतच होतो. या फळांचा औषधी उपयोगही आहे. किंचितशा आंबट असलेल्या कदंबाच्या फळांचा रस पोटाच्या तक्रारींसाठी देतात. जखमांवर पानांचा रस, तर खोडाचा काढा सर्दी-खोकल्यावर औषधाचे काम करतो.
