
झाडाचे नाव:
उंबर
वृक्ष संबंधित नक्षत्र:
कार्तीक
वैज्ञानिक पद्धतीने दिलेले नाव:
FICUSGLOMERATA
माहिती:
उंबराचे झाड खूप मोठे असते. या झाडाचे खोड पांढरट रंगाचे असते. याची पाने हिरव्या रंगाची असतात. या पानांचा आकार लांबट असतो. तसेच या झाडांच्या पानांवर फोडफड असतात. हे झाड साधारणपणे ४० ते ४५ फूट उंच असते.या झाडाला खोडाच्या जवळ झुपक्यांनी गोल फळे येतात. ही फळे कच्ची असताना हिरवी, तर पिकल्यावर लाल रंगाची होतात. या झाडाखाली सद्गुरु दत्ताचे स्थान असते अशी लोकांची श्रद्धा आहे. म्हणून याला औदुंबर असे म्हटले जाते. हे झाड जमिनीतील पाण्याचा साठा दर्शवते. हे झाड जिथे असेल तिथे पाण्याचा साठा निर्माण होतो. शिवाय हे २४ तास प्राणवायू हवेत सोडते. या झाडाचे फूल कधीच दिसत नाही. उंबर हेच याचे फूल. उंबरामध्ये फुलाचे सर्व अवयव दिसतात. उंबरात किडे असतात. उंबराच्या झाडाला पार बांधलेला असेल तर त्या झाडाला औदुंबर म्हणतात. याची सावली अतिशय शीतल असते झाडाचा पाला, फळे, साल गुरांना चारा म्हणून वापरतात. उंबराचे झाड हे पक्षी, कीटक, खारी यांचे आवडते वसतिस्थान असते. माणसे फळे खातात व औषध म्हणून झाडाचा उपयोग करतात. जिथे उंबर असतो तिथे पाण्याचा स्रोत असतो. याचे लाकूड पाण्यात दीर्घकाळ टिकाव धरते म्हणून या लाकडाचा दाराच्या चौकटीत खालचे बाजूस उंबरा किंवा उंबरठा बनविण्यासाठी वापरतात. सूर्योदयाच्या आधी झाडाला खरवडले तर खोडातून चीक येतो. हा चीक गालगुंड झालेल्या गालाला लावला तर आराम मिळतो. हा चीक शीतगुणांचा असून त्यायोगे दाहाचे शमन होते.
