
झाडाचे नाव:
फणस
वृक्ष संबंधित नक्षत्र:
उत्तर आषाढ
वैज्ञानिक पद्धतीने दिलेले नाव:
ARTOCARPUS HETEROPHYLLUS
माहिती:
मोरेसी कुलातील हा सदाहरित वृक्ष असून त्याचे शास्त्रीय नाव आर्टोकार्पस हेटरोफायलस आहे. वड, अंजीर, उंबर इ. वनस्पती याच कुलात मोडतात. फणस वृक्ष १८ज्ञ्२५ मी. उंच वाढतो. खोडाची साल जाड, काळसर व भेगाळलेली असते. पाने साधी, मोठी, गर्द हिरवी, वरून चकचकीत तर खाली फिकट, लंबगोल व गुळगुळीत असतात. फुले एकलिंगी असतात. नर-फुले व मादी-फुले वेगवेगळ्या फुलोऱ्यांत येतात. नर-फुलांचे गुच्छ नलिकाकृती असून ते पानांमागे दडलेले दिसतात. मादी-फुलांचे फुलोरे मोठे व काटेरी असतात. फळे मोठी, गोल किंवा लंबगोल आणि बाहेरून काटेरी असतात. फणसाचे संयुक्त फळ हे अनेक फुलांपासून तयार झालेले असते. याला सरसाक्ष प्रकार म्हणतात. फळे झाडाच्या मुख्य खोडावर आणि फांद्यांवर येतात. फळ वजनदार असते. सुरुवातीला हिरवे असणारे फळ पिकले की पिवळसर किंवा तपकिरी दिसते. फळात लहानलहान कप्पे असतात. त्या प्रत्येक कप्प्यात एक बी असते. बी आठळीसारखी असून तिच्याभोवती मृदू पिवळसर रंगाचा गोड गर असतो. बी आणि गर यांना एकत्रितपणे गरा म्हणतात. बियांमध्ये पिठूळ व तेलकट खाद्य भाग असतो. फणसाचे पिकलेले गरे खातात. गऱ्यांच्या मांसल भागात ७८·२% जलांश, १८·५% कर्बोदके तसेच अ आणि क जीवनसत्त्वे असतात. त्यापासून जॅम, जेली, लोणची व पाक हे खाद्यपदार्थ तयार करतात. कोवळा फणस भाजीसाठी वापरतात. फणसाचे लाकूड जॅकवूड नावाने प्रसिद्ध असून ते फर्निचरसाठी वापरतात. त्याला वाळवी लागत नाही.
